आमच्याबद्दल
सुभाष ओऊळकर , मी स्वतः अनंत जाधव व आनंद मेणसे आम्ही तिघेही कार्यकर्ते पण कार्यक्षेत्रे वेगळी. आम्हा तिघांपैकी कोणालाही प्राथमिक शाळा चालवण्याचा अनुभव नव्हता. प्राथमिक शाळेचे माध्यम कोणते असावे याबाबत विचार स्पष्ट होता. पण तेवढ्याने काम भागणार नव्हते. शाळेला वैचारिक पायाअसावयास हवा याबद्दल आम्हा तिघांत एकमत होते व कार्यकारिणीचाही त्याला पाठिंबा होता.आपली शाळा जातीयवाद, धार्मिक कर्मकांड यापासून कटाक्षाने दूर ठेवायची व फुले, शाहू,आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवायचा एवढे आम्हाला कळत होते. पण प्रत्यक्षात काम कसे चालते याची कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत करायचे काय हा प्रश्न होता.
या विषयावर आम्ही तासंतास चर्चा करीत असू, अशीच चर्चा करीत असताना एक विचार पुढे आला की आपण प्राथमिक शाळा समजून घ्यायच्या. त्यासाठी महाराष्ट्रात एक दौराच काढायचा. असे ठरल्यावर आम्ही एक दिवस मुंबईस गेलो. तेथे चक्क पाच सहा दिवस राहिलो. या दौऱ्यात मी, सुभाष ओऊळकर, आनंद मेणसे आणि रमेश पवार असे चौघेजण होतो. आधी ठरल्याप्रमाणे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर काम केलेल्या कॉ. विनायकराव शिर्के यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला मुंबईतील वेगवेगळ्या शाळा दाखविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ते आमच्या बरोबर होते. मुंबईतील शिक्षण क्षेत्रात त्यांना मोठा मान असल्यामुळे शाळा पाहणे, काम समजून घेणे सोपे गेले. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा दाखविल्या.दिवसभर शाळा पाहायची आणि संध्याकाळी चर्चा करायची असे हे काम चालले.शिर्के मामांच्या बरोबर आम्ही पहिल्या दिवशी सांताक्रूझच्या चुना भट्टी या भागातील सानेगुरुजी विद्यालयात गेलो. तेथे दिवसभर राहून शाळेतील सर्व उपक्रम आम्ही समजून घेतले.
शाळेमध्ये संगीत विभाग असावयास हवा ही कल्पना आमच्या मनात रुजली ती या शाळेमुळे. शाळेचे कार्यवाह शाहीर लीलाधर हेगडे यांचा आणि आमचा स्नेह जुळला तो कायमचा. या शाळेकडून आम्ही बरेच शिकलो. दुसऱ्या दिवशी दहिसर येथील एक इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही पाहिली. अत्यंत श्रीमंत पालकांच्या मुलांसाठी ही शाळा होती. वर्गखोलीची रचना, प्रत्त्येक वर्गखोलीत असलेला टी.व्ही. संच, अनेक प्रकारच्या अनेक शैक्षणिक कॅसेट्स हे आम्ही प्रथमच पाहत होतो. एका वर्गात भूगोलाचा तास सुरु होता. शिक्षक नाईल नदीविषयी माहिती सांगत होते. त्यांनी एक कॅसेट लावली ज्यामध्ये नाईल नदीच्या उगमापासून सर्व माहिती सचित्र देण्यात आली होती. हे आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी पाहिले. आज आयटीसी पद्धतीचे शिक्षण( इन्फॉरमेशन कम्युनिकेशन टेकनॉलॉजि ) असावे असा विचार पुढे आला आहे. या शाळेने मात्र तेव्हाच त्याची सुरुवात केली होती. आमच्या देशात काही मुलांना बसावयास चांगली जागा मिळत नाही, पाटी पुस्तक मिळत नाही व काहींना बरेच काही मिळत नाही हे आम्ही ऐकून होतो त्या दिवशी ते आम्ही अनुभवले.
अशा अनुभवातून आम्ही शिकत होतो. शिर्केमामा आम्हाला शिकवत होते. तिसऱ्या दिवशी आम्ही मुंबईतील सुप्रसिद्ध बालमोहन विद्यालयाला भेट देणार होतो. याच शाळेतील विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने येतात असा या शाळेचा लौकिक. शिक्षण तज्ञ दादासाहेब रेगे यांनी ही शाळा सुरु केली. त्यांचे चिरंजीव बापूसाहेब यांनी त्यांचा समृद्ध वारसा पुढे चालविल्याचे आम्ही ऐकून होतो. आम्हा बेळगावकरांसाठी आणखी एका कारणास्तव या शाळेबद्दल खूप आस्था. मुंबईत जेव्हा जेव्हा सीमाप्रश्नावर आंदोलने छेडली गेली तेव्हा तेव्हा बेळगावातून कार्यकर्ते मुंबईस गेले. यातील अनेकांची राहण्याची सोय बालमोहन शाळेने केली. त्यामुळे शाळेबद्दल आदर. शिर्केमामांच्या बरोबर शाळेत गेलो तेव्हा बापूसाहेब रेगे यांनी आमचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. शाळा स्वतः फिरून दाखवली. उपक्रम समजावून सांगितले. शाळेत त्यावेळी समूह गीत गायनाचा सराव सुरु होता. तो आम्हाला पाहता आला. त्यानंतर बापूसाहेबांनी शाळेतील सर्व शिक्षकांची सभा बोलावून आमचा सत्कार केला व आमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. बालमोहन विद्यालयात आम्ही सकाळी लवकर गेलो होतो. सायंकाळ कशी झाली हे कळलेसुद्धा नाही. शाळेतून बाहेर पडलो व चहा घेण्यासाठी दादरमधील एका हॉटेलमध्ये बसलो. चहा घेत असताना आम्ही शिर्केमामांना सहज विचारले,"आम्हाला कॉ. डांगे यांची भेट मिळेल का ?" तो कालखंड असा होता की कॉ. डांगे वयोपरत्वे राजकारणापासून खूप अलिप्त झाले होते. त्यांनी कामगार चळवळ, राष्ट्रीय आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम, सयुंक्त महाराष्ट्राचा लढा यामध्ये केलेल्या नेतृत्वामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर होता.
विभाग
बालमंदिर विभाग
"मुलांच्या शिक्षणाचा पहिला टप्पा म्हणजे बालवाडी. १९९० साली बालमंदिर विभागापासून सुरु झालेली मराठी विद्यानिकेतन ही शाळा."
पुढे वाचाप्राथमिक विभाग
"धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन ही तत्वे स्वीकारली आहेत. प्रवेशप्रक्रियेपासून ते शाळेत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या तत्वांना धरून असतात."
पुढे वाचामाध्यमिक विभाग
"शाळा सुरु करत असताना काही ध्येय, धोरणे ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील काही उपक्रमशील व प्रयोगशील शाळेचे निरीक्षण केले गेले."
पुढे वाचा