आम्ही कॉ. डांगे यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या कन्या रोझा देशपांडे यांनी आमचे स्वागत केले. शिर्केमामांना पाहून या मास्टर असे त्यांनी म्हटले. शिर्केमामानी आनंद मेणसे यांचा त्यांना परिचय करून दिला. बेळगावच्या कॉ. मेणसे यांचे हे चिरंजीव,'डी' ना भेटण्यासाठी आले आहेत असे मामा म्हणाले. रोझा ताईंनी आम्हाला आत येऊन बसण्याची खूण केली व त्या आत गेल्या. केवळ काही मिनिटातच कॉ. डांगे आमच्या पुढे येऊन बसले. आम्ही त्यांना नमस्कार केला. 'काय म्हणतो कृष्णा ?' असे म्हणत त्यांनी कॉ. मेणसे यांची चौकशी केली. आनंद मेणसे यांच्या पाठीवरून हाथ फिरवला. का आला होता मुंबईत ? असे आम्हास विचारले. आम्ही आमच्या येण्याचे प्रयोजन त्यांना सांगितले. आम्ही शाळा काढतो आहोत हे ऐकुन त्यांनी समाधान व्यक्त केले. तुम्ही हे करता आहात हे खूप चांगले आहे. तुमच्या या कामाला माझ्या शुभेच्छा आहेत. असे ते म्हणाले. नव्वदीच्या घरात असलेले कॉ. डांगे अतिशय स्पष्टपणे आपले विचार मांडत होते. नंतर त्यांनी आम्हाला आग्रहाने चहा दिला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. कॉ. डांगे यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नेत्याने आमच्या उपक्रमाला आशीर्वाद दिल्याने आम्हाला आता खूप बळ आले होते. चौथ्या दिवशी सकाळी शिर्केमामांच्या कांदिवली येथील बंगल्यावर चर्चेचा कार्यक्रम होता. गेल्या तीन दिवसात आम्ही काय पाहिले व त्यातील आम्ही काय स्वीकारायचे यावर दीर्घ चर्चा झाली. दुपारचे भोजन घेऊन आम्ही शिर्केमामांचा निरोप घेतला. त्यानंतर पुण्यातील नूतन मराठी विद्यालय व इतर शाळा पाहिल्या.
प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा कशा चालविल्या जातात याचा अनुभव आम्हाला या दौऱ्यात घेता आला. निरनिराळ्या स्तरावरील निरनिराळ्या शाळा पहिल्या. झोपडपट्टीतील शाळा, मध्यमवर्गीयातील शाळा व उच्चवर्णीयातील शाळा. तसेच या एकूण कार्याकडे पाहण्याची आमची दृष्टीही बदलली. शाळा जर चालवायची असेल तर संचालकांनीसुद्धा सतत उपक्रमशील राहिले पाहिजे व शिकत राहिले पाहिजे तरच शाळा विकसित होत जाईल हा विचार आमच्या मनात कायमचा रुजला. कार्यकर्त्यांनी इमारतीसाठी निधी जमविला पाहिजे. फर्निचर जमवले पाहिजे.पण त्याच बरोबर आपला बौद्धिक विकास केला पाहिजे हे मुंबईतील दौऱ्याने आम्ही शिकलो. त्यानंतर कोल्हापूर येथील शिक्षणतज्ञ सृजन आनंद विद्यालयाच्या लीलाताई पाटील, सुचिताताई पडळकर, पुण्यातील अक्षरनंदन शाळेच्या विद्याताई पटवर्धन, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे, नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे अशा अनेकांशी आम्ही आमचे नाते जोडले. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक याना आज लाभ होत आहे. ३१ मे १९९० रोजी डॉ. विजय देसाई यांच्या हस्ते या शाळेचे उदघाटन करण्यात आले. या शाळेतील देणगीदारांनी व हितचिंतकांनी एवढा प्रतिसाद दिला की दहा वर्षातच एवढी मोठी इमारत तयार झाली. पंचवीस वर्षाचा कालावधी कसा निघून गेला हे आम्हाला कळलेही नाही.शाळेची इमारत उभी करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते बेळगावातील अनेक शिक्षणप्रेमी नागरिकांना भेटलो. संस्थांना भेटलो. सर्वांनीच आम्हाला भरपूर मदत केली आणि त्यामुळेच पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही जे काम हाती घेतले ते यशस्वी झालेले पाहताना मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना आनंद होत आहे.आज या शाळेमध्ये तेराशे विद्यार्थी शिकत आहेत. सर्व सुखसोईंनी इमारत सुसज्ज आहे. आमचे हे यश म्हणजे द.म.शि. मंडळाचे, शाळा विकास समितीचे, शाळा शिक्षक,पालक,विद्यार्थी,हितचिंतक या सर्वांचे यश आहे अशी आमची भावना आहे.
मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. या प्रश्नाचा खालील अंगाने विचार करता येईल.
-
शिक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून शिक्षणाचे माध्यम
-
बालमानसशास्त्राच्या दृष्टीने शिक्षणाचे माध्यम
-
भाषाशास्त्राच्या दृष्टीने भाषेचा अभ्यास
-
ज्ञानार्जनाच्या दृष्टीने मातृभाषेचे स्थान
शिक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम. मुलं जन्मल्यानंतर पहिला आवाज ते ऐकते तो मातेचा असतो. शिक्षणाचे पहिले धडे मातेकडूनच मिळतात. जगात कुठल्याही देशात परकीय भाषा हे शिक्षणाचे माध्यम नाही. जपान,जर्मनी,फ्रान्स,रशिया या देशात मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम आहे.
मानसशास्त्राच्या दृष्टीने पाच वर्षाच्या बालकाला परिसरातील, घरातील भाषिक वातावरणापासून परक्या भाषेची ओळख पेलणार नाही. भाषाशास्त्रज्ञ मुदलियार म्हणतात, No two languages should be introduced at one time मातृभाषेचा पाया पक्का झाल्यानंतर दुसरी भाषा शिकवावी.
भाषा अनुकरणाने शिकायची असते. प्रथम ऐकणे व नंतर बोलण्याचा प्रयत्न करणे. प्रथम मूल चुका करील. पण या चुका आपोआप पुढे दुरुस्त होतात, चुका दुरुस्त कराव्या लागत नाहीत. शब्द किंवा व्याकरण शिकून भाषा येत नाही. ती फक्त पोपटपंची होते. आज बहुसंख्य इंग्रजी माध्यमाच्या शाळात पाठांतर होते.'पोपट' तयार होतात,'पदवीधर' नव्हे
ज्ञानाचा आणि मातृभाषेचा घनिष्ट संबंध आहे. खरे ज्ञान मातृभाषेतूनच मिळविता येते. भाषा हे मानवाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. निसर्गातील दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला हे वरदान निसर्गाने दिलेले नाही. म्हणून वाचन, लिहणं, शिकणं, शिकविणे, थोडक्यात वाचन संस्कृती ही मानवाला लागलेला विस्तवानंतरचा महत्वपूर्ण शोध आहे.मानवाची प्रगती, विकास या एका शोधामुळे झालेला आहे. होत आहे व होत राहील. म्हणून शिक्षणाचे महत्त्व या शिक्षणाची सुरुवात मातृभाषेतून होते. पण या शिक्षणाकडे, प्राथमिक शिक्षणाकडे शासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे.मातृभाषेकडे, मराठीकडे दुर्लक्ष होत आहे.
मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. पण आज ती शासनाच्या दारात फाटकी वस्त्रे नेसून उभी आहे. शासन तिच्याकडे लक्ष देईल का ? मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व शासनाला पटेल का ? बेळगावसारख्या सीमाभागातील मराठीच्या आर्त टाहोला (मराठीच्या खऱ्या अभिमानाला) 'केवळ वर्षातून एकदा वंदेमातरम करणाऱ्याला नव्हे' ऐकू जाईल का ?