मुलांच्या शिक्षणाचा पहिला टप्पा म्हणजे बालवाडी. १९९० साली बालमंदिर विभागापासून सुरु झालेली मराठी विद्यानिकेतन ही शाळा. बालमंदिरापासूनच वेगळेपण जपल्यामुळे असेल कदाचित विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढली की ड्रॉ पद्धतीने प्रवेश दिला जात असे. हसतखेळत शिक्षण हा बालमंदिर विभागाचा गाभा आहे. इतर शाळांसारख्या चकचकाट, झगमगाट इथे नाही, कारण इथे पालकांचा खिसा नाही, बालकांची मने जपली जातात.
बाल मने अभ्यासाच्या ओझ्याखाली, बाकड्यांच्या अडगळीत न गुदमरता त्यांनी या बालवयात स्वच्छंदी जगावे, फुलांप्रमाणे फुलावे, मधमाश्यांप्रमाणे फिरत फिरत ज्ञान ग्रहण करावे हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन शाळा अभ्यासक्रम तयार करते. त्यामुळे परिसर सहल, जीवन व्यवहार, कलानुभव, मुक्त व्यवसाय हे इतर शाळांपेक्षा वेगळे विषय बालमंदिर विभागामध्ये शिकविले जातात. ज्यामध्ये बालकांचा सर्वांगीण विकास होऊन ते एखाद्या विषयाचा चोहोबाजूनी विचार करू शकेल अशी अभ्यासक्रम पद्धतीत बालमंदिर विभागाने कालानुरूप बदलत्या स्वरूपाची ठेवली आहे.यात सातत्याने बदल केला जातो. कारण पिढी दर पिढी मुलांची मानसिकता बदलत आहे. शाळा स्थापन झाली त्यावेळी मुलं टी.व्ही., कॉंम्पुटर, मोबाईलच्या इतकी जवळ नव्हती. ती गाणी, गोष्टीत मस्त रमणारी मुलं काळाच्या ओघात हरवली व सध्याची फास्टफूड खाणारी मुलं तसाच फास्ट विचारसुद्धा करायला लागली आहेत. त्यामुळे शिक्षणतज्ञ लिलाताई पाटील, सुचीताताई पडळकर, आनंद मेणसे सर, शीतलताई बडमंजी यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमामध्ये लवचिकता ठेवली आणि विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम कुठूनही न घेता बालमंदिर मधील शिक्षकांनी तो विविध विषयाचा, बालमानसशास्त्राचा अभ्यास करून स्वतः तयार केलेला आहे.
आजच्या तंत्रज्ञानाचाही उपयोग मुलांना समजावा यासाठी ज्या गोष्टी प्रत्यक्ष दाखवू शकत नाही तेथे प्रोजेक्टचा वापर केला जातो. शालेय जीवनातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे खेळ. आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे, वाढत्या शाळांमुळे मैदान नावालासुद्धा शिल्लक नाहीत. पण आमच्या शाळेला मात्र प्रशस्त्र असे क्रीडांगण आहे. वाळूचा हौद, जंगलजीम(माकडजीना), घसरगुंडी, झोपाळा, सी-सॉ तसेच बैठे खेळही भरपूर प्रमाणात मुलांना खेळायला दिले जातात. बालमंदिरातील बैठक व्यवस्था ही बंदिस्त बाकड्यांची नसून भारतीय बैठक व्यवस्था आहे. त्यामुळे मुलं अगदी घरगुती वातावरणात अनुभव घेत शिकत असतात. 'कधी लोळा कधी खेळा' या पद्धतीने इथे अंक आणि अक्षरांच्या लिखाणाचा बाऊ, भडीमार न करता ती ओळखता येणे, त्याचे शब्द सांगता येणे, त्याचा नीट उच्चार होणं, नीट पूर्ण वाक्यात बोलता येणं यावर भर दिला जातो. कारण ऐकणं, बोलणं, वाचणं आणि सगळ्यात शेवटी लिखाण भाषा शिकण्याचा टप्पा असाच आहे.
या बदलत्या अभ्यासक्रमामुळे पालकांनी सतत शाळेत भेटून आपली मुलं अवांतर प्रश्न विचारतात. सतत बोलत असतात. छान माहिती सांगतात. शाळेत प्रवेश घेतला तेव्हा रडत येणारी मुलं आता शाळेला जाऊ नकोस म्हटले तर रडतात. कारण शाळेत रोज नवी गंमत असते असे मुले सांगतात असाच अभिप्राय पालकांनी पालक भेटी दरम्यान दिला.
आमच्या बालमंदिरमधील सर्वच शिक्षक अनुभव समृद्ध असून वर्षातून दोन वेळा शिक्षकांच्या कार्यशाळेमधून या स्पर्धात्मक युगाशी स्पर्धा करण्यासाठी ते सर्व दृष्टीतून तयार होत असतात. कारण मागणी तास पुरवठा याप्रमाणे एखाद्या कारखान्यातील प्रॉडक्टप्रमाणे एकसारखी मुलं तयार न होता स्वतंत्र व्यक्ती म्हणून या बालमंदिरात मुलांना घडविले जाते. कारण आमच्या शाळेतील सगळीच मुले डॉक्टर, इंजिनियर बनणार नाहीत पण फुलांपानांवर, प्राणीपक्षांवर प्रेम करणारी, सामाजिक भान असणारी उत्तम नागरिक नक्कीच बनतील.