शाळेचा इतिहास
सुभाष ओऊळकर , मी स्वतः अनंत जाधव व आनंद मेणसे आम्ही तिघेही कार्यकर्ते पण कार्यक्षेत्रे वेगळी. आम्हा तिघांपैकी कोणालाही प्राथमिक शाळा चालवण्याचा अनुभव नव्हता. प्राथमिक शाळेचे माध्यम कोणते असावे याबाबत विचार स्पष्ट होता. पण तेवढ्याने काम भागणार नव्हते. शाळेला वैचारिक पायाअसावयास हवा याबद्दल आम्हा तिघांत एकमत होते व कार्यकारिणीचाही त्याला पाठिंबा होता.आपली शाळा जातीयवाद, धार्मिक कर्मकांड यापासून कटाक्षाने दूर ठेवायची व फुले, शाहू,आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवायचा एवढे आम्हाला कळत होते. पण प्रत्यक्षात काम कसे चालते याची कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत करायचे काय हा प्रश्न होता.
या विषयावर आम्ही तासंतास चर्चा करीत असू, अशीच चर्चा करीत असताना एक विचार पुढे आला की आपण प्राथमिक शाळा समजून घ्यायच्या. त्यासाठी महाराष्ट्रात एक दौराच काढायचा. असे ठरल्यावर आम्ही एक दिवस मुंबईस गेलो. तेथे चक्क पाच सहा दिवस राहिलो. या दौऱ्यात मी, सुभाष ओऊळकर, आनंद मेणसे आणि रमेश पवार असे चौघेजण होतो. आधी ठरल्याप्रमाणे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर काम केलेल्या कॉ. विनायकराव शिर्के यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला मुंबईतील वेगवेगळ्या शाळा दाखविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ते आमच्या बरोबर होते. मुंबईतील शिक्षण क्षेत्रात त्यांना मोठा मान असल्यामुळे शाळा पाहणे, काम समजून घेणे सोपे गेले. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा दाखविल्या.दिवसभर शाळा पाहायची आणि संध्याकाळी चर्चा करायची असे हे काम चालले.शिर्के मामांच्या बरोबर आम्ही पहिल्या दिवशी सांताक्रूझच्या चुना भट्टी या भागातील सानेगुरुजी विद्यालयात गेलो. तेथे दिवसभर राहून शाळेतील सर्व उपक्रम आम्ही समजून घेतले.